मावळ जनसंवाद:- सध्या विद्यार्थ्यांमध्ये स्नेहमेळावे आयोजित करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. शाळा संपल्यानंतर काही वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा ग्रुप एकत्र येऊन हॉटेल, रिसॉर्ट, किंवा बैंक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात स्नेह मेळावे साजरे होत असलेले पहावहास मिळत आहे. मात्र हे मेळावे खरंच नाती जपण्यासाठी आहेत की केवळ सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी? असा प्रश्न उपस्थित रहात आहे.
काही शाळेतील वर्गातील गमतीदार किस्से, शिक्षकांचा विशिष्ट संवाद किंवा लकब, कोणीतरी शिक्षकांपासून सुटण्यासाठी केलेले बहाणे, वर्गातील विनोदी प्रकार, चुपचाप खोड्या करणारे मित्र, गृहपाठ न केल्यामुळे मिळालेली शिक्षा, संपूर्ण वर्गाला बाहेर उभं करण्यात आलेले प्रसंग, वर्गात लपून खाद्यपदार्थ खाण्याचे गुप्त मिशन, परीक्षा आणि नकल करण्याचे किस्से, नकल करण्यासाठी केलेले वेगवेगळे प्रयत्न, मित्रांनी पेपर कसा सोडवला, फर्स्ट बेंचर्स कसे होते, बेंच पार्टनरशी असलेली घट्ट दोस्ती, माझे मित्र कोण, कोणाशी भांडण झाले, कोणासोबत कट्टी घेतली अशा आठवणी, खेळ आणि ग्राउंडवरील आठवणी. यासारख्या अनेक आठवणींना उजाळा देण्यासाठी गेट टुगेदर हे होत आहेत. गेट टुगेदरमध्ये शाळेतील या साऱ्या आठवणी शेअर केल्या की हास्याची लाट पसरते, तर काही क्षण भावनिकही होतात. त्यामुळे असा स्नेह मेळावा आयोजित करून या गोड आठवणी पुन्हा जिवंत करण्यासाठी सर्व मित्र प्रयत्न करताना दिसत आहेत. ह्या मेळाव्यांचा उद्देश की केवळ दिखावा? पूर्वी स्नेह मेळावे साध्या पद्धतीने होत होते. शाळेत किंवा एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी बसून गप्पा, आठवणींना उजाळा आणि काही वेळ एकत्र घालवण्यावर भर दिला जात असे. मात्र, हल्ली हे मेळावे मोठ्या हॉटेल्समध्ये, आकर्षक ड्रेसकोडसह, डीजे आणि महागड्या भेटवस्तूंसह आयोजित केले जात आहेत. स्नेह मेळावे चांगली गोष्ट आहे, पण हल्ली त्यात दिखाऊपणा जास्त दिसत आहे. फोटो काढणे आणि सोशल मीडियावर पोस्ट करणे यावरच भर दिला जातो आहे.स्नेह मेळावे खरंच नाती जपण्यासाठी होत असतील आणि जुन्या मित्रांना पुन्हा जोडण्यासाठी असतील, तर ते गरजेचे आहेत. मात्र, जर त्यांचा हेतू केवळ सोशल मीडियावर पोस्ट टाकणे आणि स्टेटस सिम्बॉल म्हणून आयोजित करणे असेल, तर तो फक्त एक फॅड ठरतो. त्यामुळे अशा कार्यक्रमांना खरा हेतू असावा, अशी भावना अनेक माजी विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
एकत्र येण्याचा चांगला पर्याय काही जण स्नेह मेळाव्यांना सकारात्मक दृष्टीने पाहतात. शाळेनंतर अनेक मित्रांचे संपर्क तुटतात. अशावेळी हा कार्यक्रम पुन्हा एकत्र येण्याचा चांगला पर्याय ठरतो. काही ठिकाणी हे मेळावे समाजोपयोगी कार्यासाठीही वापरले जातात. अनाथालय भेट, पुस्तक दान, किंवा करिअर मार्गदर्शन सत्रे अशा उपक्रमांसह स्नेह मेळावे घेतले जात असल्याने त्याचा अधिक चांगला उपयोग होतो.
0 Comments