मावळ जनसंवाद :- मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात धरणे निसर्ग सौंदर्य तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ह्या डोंगर भागात अनेक फार्म हाऊस बंगले मोठ्या प्रमाणात आहे. धावपळीच्या युगात अथवा आधुनिक जीवनशैलीमध्ये विविध डेज सेलिब्रेशनचा ट्रेंड वाढत आहे. डिसेंबरअखेर आल्याने थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. नववर्षाचे स्वागतही जल्लोषी केले जाणार आहे. आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांना इव्हेंटचे स्वरूप येत आहे. मात्र, या आनंदाची दुसरी बाजू म्हणजे या सेलिब्रेशनच्या नावाखाली चालणारी व्यसनाधीनता, चुकीच्या गोष्टींचा पायंडा,पाश्चिमात्यांचे अंधानुकरण यामुळे तरुणाई भरकटत असल्याचे दाहक वास्तव समोर येत आहे.विज्ञान संशोधनामुळे आजचे युग टेक्नोसॅव्ही बनले आहे. या स्मार्ट फोनबरोबर तरुणाई स्मार्ट होत आहे. इंटरनेट हा जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागला आहे. माहितीचे महाजाळे निर्माण झाल्याने जग जवळ आले आहे वस्तुस्थिती आहे. त्याबरोबर पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव झाला असून सेलिब्रेशनचा ट्रेंड वाढला आहे. क्षुल्लक कारणासाठी देखील सेलिब्रेशन केले जात आहे. यामध्ये तरुणाईची संख्या जास्त आहे. ३१ डिसेंबर अखेर जवळ आल्याने मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सेलिब्रेशन केले जात असल्याने सर्वत्र अथवा जिल्ह्यातही थर्टीफर्स्ट साजरा होत आहे. अनेक ठिकाणी पार्ट्यांना बहर आला असून नववर्षाच्या स्वागतासाठी पुढील काही दिवस तो कायम राहणार आहे. सेलिब्रेशनसाठी हजारो लिटर मद्य रिचवले जात आहे. मांसाहाराला प्राधान्य दिले जात असल्याने शेकडो कोंबड्या, बोकडांचा फडशा पडत आहे. सेलिब्रेशनच्या फंड्यातूनच अनेकजण व्यसनांमध्ये गुरफटत आहेत. व्यसनांच्या आहारी जाऊन चुकीची पाऊले उचलत आहेत.सामाजिक सभ्यता कमी होत असून अश्लिलता व बीभत्सतेचे दर्शन होत आहे. हल्ली तरुणाईमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहे. मद्यासह विविध नशा केल्या जात असून त्याची सुरुवातच अशा सेलिब्रेशनमधून होत आहे. चुकीचा पायंडा पाडला जात असल्याने पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण स्वतः सह कुटुंबाचे भविष्य धोक्यात घालत आहे. दरम्यान, हल्लीची पिढी सोशल मीडियाचा अतिरेकी वापर करत आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेलेली तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात सहजतेने अडकत आहे. कुतूहलापोटी केलेले सचिंग पोर्नग्राफीपर्यंत पोहोचत आहे. व्यसनाधीनतेमुळे मनस्थिती दुभंगत आहे. धैर्य, सकारात्मकता हरवली असून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.
नशेची झिंग लावतेय देशोधडीला
नशेची झिंग चढल्यावर त्यांना कशाचेच भान राहत नाही. नशेड्यांकडून मुली, महिलांची छेडछाड तसेच खून, मारामाऱ्याही केल्या जात आहेत. अशा अवस्थेत बेदरकारपणे वाहने चालवली जात असल्याने वेगावर नियंत्रण राहत नाही. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुणाईचा बळी जात आहे. ऐन तारुण्यात जीवाला मुकत आहेत ही परिस्थिती मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे ही काळाची गरज आहे अशी मागणी नागरिक करीत आहे.
0 Comments