मावळ जनसंवाद :-डिजिटल युगातही पारंपरिक प्रचाराचा बाज भाषण, लाऊडस्पिकर, पत्रके, ध्वज, मफलर, टोपी प्रचारात प्रभावी ठरत आहे. सध्याच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात पारंपरिक प्रचाराचा बाज कायम असल्याचे चित्र मावळ तालुक्यात पहावयास मिळत आहे. भाषण, लाऊडस्पिकर, पत्रके, ध्वज, मफलर, टोपी प्रचारात प्रभावी ठरत आहे. यामुळे डिजिटल युगातही पारंपरिक प्रचाराच्या माध्यमातून प्रचार धडाक्यात असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ विधानसभा मतदारसंघातील प्रचारात डिजिटल यंत्रणेवर भर असला तरी पारंपरिक प्रचार तेवढाच प्रभावी ठरत आहे. त्यामुळे पारंपरिक प्रचाराच्या माध्यमावर भर देण्यास उमेदवारांकडून प्राधान्य दिले जात आहे. पूर्वी पेंटरकडून गावोगावी भिंती रंगवून, प्रचार बॅनर तयार केले जात होते. रिक्षा व इतर वाहनांच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकाद्वारे मतदानाचे आवाहन करावे लागते. प्रचारपत्रके वाटावीच लागतात. ध्वज, मफलर, टोपी, उमेदवार यांच्या गाडीमागे कार्यकर्त्यांच्या गाडीच्या रांगा तसेच उमेदवाराचे स्वागत व स्वागताला ढोल ताशाची मिरवणूक व स्वागतासाठी भला मोठा झेंडूच्या फुलाचा हार व जेसीबी मधून फुलाची उधळण यांचीही क्रेझ कायम आहे.
डिजिटलचे गुणगाण कितीही गायले तरी या पारंपरिक प्रचाराचा बाज कायम असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. कोणतीही निवडणूक म्हटली की प्रचार हा आलाच. परंतु पूर्वीची निवडणूक आणि आताची निवडणूक यामध्ये चांगलाच फरक दिसून येत आहे. पूर्वी साधनांची कमतरता होती. मात्र आता साधनांची मुबलकता आहे. बदलत्या काळानुसार प्रचार आणि प्रचाराची साधने बदलली आहेत. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. व्हॉटस्अॅप, व्हाट्सअप स्टेटस, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी माध्यमातून प्रत्येक जण हा व्यक्त होत असतो. राजकारणातही या माध्यमांचा वापर सध्या केला जात आहे.
0 Comments