Header Ads Widget


Flash news

    Loading......

सफर ३६१ किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम

मावळ जनसंवाद :-  ढाक बहिरी गडावर पर्यटकांकडून तसेच भाविकांकडून होणारी घाणीमुळे येथे घाणीचे साम्राज्य पसरले होते. ढाक गडाला संवर्धनाची आवश्यकता व लेणीला स्वच्छतेची आवश्यकता असल्याचे सफर ३६१ किल्ल्यांची या ग्रुपच्या सदस्यांचा ही बाब लक्षात आली. आणि काही दिवसांत ह्या ग्रुपच्या मार्फत येथील लेणीची स्वच्छता मोहीम करण्यात आली.ढाक बहिरी लेणीवर असणारे बहिरी हे देवस्थान अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लेणी इतक्या उंचीवर असून देखील येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. येथे येणाऱ्यांना बाराही महिने पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. पूर्वी येथे पिण्याच्या पाण्यासाठी तीन पाण्याचे टाके खोदलेले आहेत. पण आज त्याच टाकात डोकवल्यावर स्वतःचा चेहराही दिसणार नाही इतके पाणी खराब झाले होते. येथे भाविकांकडून मोठया प्रमाणात कोंबड्या व बकीरी कापली जातात. लेणीवर असणाऱ्या टाक्यांमध्ये उरलेली सर्व घाण टाकली जाते. लेणीत असणाऱ्या पाण्याच्या टाकीत भांडी ठेवलेली असतात. मात्र येथे येणारे पर्यटक व भाविक ह्या टाकीत अंघोळीसाठी उतरतात. खरकटी भांडी, उरलेलं अन्न ह्या पाण्याच्या टाकीत टाकून देतात. त्यामुळे ह्या लेणीत घाणीचे साम्राज्य असते. पूर्वी असलेली पवित्र जागा आज येथील घाणीच्या साम्राज्यात हरवली आहे. हे ठिकाण फक्त भाविकांसाठी पार्टीचे ठिकाण झाले आहे. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी सफर ३६१ ग्रुपकडून स्वछता मोहीम राबविण्यात आली. लेणीतील सर्व घाण काढण्यात आली. बकऱ्यांच्या कातड्यामुळे अक्षरशा येथे किडे झाले होते तेही साफ करण्यात आले. पाण्याच्या टाकीत असणारी भांडी व्यवस्थित साफ करून योग्य ठिकाणी ठेवण्यात आली. पण यावर हा प्रकार थांबणार नसून कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ह्या ग्रुपकडून टाकीला जाळी मारण्यात आली. त्यासाठी लागणारे जनरेटर, वेल्डिंग मशीन, जाळ्या, अँगल, खिळे हे सर्व सामान रातोरात कोंडेश्वर मंदिरापासून ते ढाक बहिरी लेणी पर्यंत ५ किमी दूर डोक्यावर वाहून नेण्यात आले. पर्यटकांना व भाविकांना घाण करण्यापूर्वी लाज वाटेल असे काही सूचना फलकही याठिकाणी लावण्यात आले.

           प्रतिक्रिया :- "आपल्या ऐतिहासिक स्थळांच होत असलेलं विद्रुपीकरण, पार्ट्या करून केलेली घाण, अस्वच्छता खटकते. जे आपलं आहे ते आपणच जपलं पाहिजे. पण आज एक तरुण पिढी,अनेक परिवार,सेवाभावी संस्था, संघटना ह्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता जिवाचं रान करून झटत आहेत.पर्यटक अन् इतरांनीही फिरायला गेल्यावर निदान आपल्याकडून आपल्या ऐतिहासिक स्थळे, निसर्ग, गडकिल्ले अन् वास्तूंचे नुकसान व विद्रुपीकरण होणार नाही, स्वच्छता राखली जाईल ह्याची काळजी घ्यायला काय हरकत आहे." अशी माहिती रवि द. केदारी, सफर ३६१ किल्ल्यांची ग्रुप  यांनी दिली.



Post a Comment

0 Comments